Thursday, February 3, 2011

एका अस्वस्थ दशकाची अखेर.....

नवे सहस्त्रक सुरु होऊन दहा वर्षे पूर्ण झालीत. कालगणनेच्या इतिहासात दहा वर्षे म्हणजे तसा फारसा मोठा कालखंड नाही. तरीही गेल्या दहा वर्षांनी जगाला जे इतके काही दिले त्याचा हिशेब मांडायचा झाला तर माझ्या सारख्या माणसाचे आणखी एक दशक काय पण पुढचे सगळ आयुष्य खर्ची पडेल. तरीपण हे शिवधनुष्य (अरे जिभेला काही हाड?) पेलण्याचा प्रयत्न करण्याचा मोह आवरला नाही म्हणून इथे लिहितोय.

दहा वर्षांपूर्वी जग थोडेसे वेगळे होते. आम्ही नुकताच इंजिनियरिंगला प्रवेश घेतला होता आणि जगण्यातल सौंदर्य अचानक कमी झाले आहे हे आजूबाजूला बघून जाणवत होते. बऱ्याच मुलांना एकतर आयटी इंजिनियर व्हायचे होते किंवा अमेरिकेत जायचे होते. माझ्यासारख्या बऱ्याचजणांना खरेतर ह्या दोघांतले काहीही करायचे नव्हते कारण आपल्याला नक्की काय करायचे आहे हेच त्यांना माहिती नव्हते. "तू मोठा झाल्यावर कोण होणार?" ह्याचे "पायलट" असे विजयी मुद्रेने दिलेल्या उत्तराचे रूपांतर आता "बघूया" (म्हणजे खरे तर "माहित नाही") असे म्हणून क्षणभरासाठी उसने आणलेल्या केविलवाण्याहास्यात झाले होते.

जगाचा नकाशा एव्हाना बराच बदलला होता. सोविएत रशिया नावाचा देश जगाच्या नकाशावर आता शोधूनही सापडत नव्हता. नेहरूंच्या समाजवादी भारताला डॉ. मनमोहन सिंगांच्या मुक्त अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्णत्वास आलेले पाहायला मिळत होते. जगाच्या मानगुटीवर बसलेले वायटूके चे भूत भारतीयांनी उतरवले होते आणि त्यातच अमेरिकेत डॉट कॉमचा फुगा नुकताच फुटला होता, एनरॉन अजूनही "America's Most Innovative Company" होती (ज्यांची innovations महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या तोंडाला फेस आणणारी ठरली हा भाग वेगळा. असो, Microsoft नावाचा टारगट मुलगा कोर्टात अंगठे धरून उभा होता आणि गुगल नावाचे बाळ नुकतंच रांगू लागले होते. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक (कशीबशी) आटोपली होती आणि २० जानेवारी २००१ रोजी श्री. जॉर्ज वॉकर बुश नावाच्या महाशयांनी अध्यक्षपदाची (किंवा वडिलांनी अर्धवट सोडलेले काम काहीही करून पूर्ण करण्याची) शपथ घेतली आणि तिथेच माशी शिंकली.

त्यानंतर फक्त आठ महिन्यानानंतर कुठल्याश्या अतिरेक्यांनी अमेरिकेत चार विमाने ताब्यात घेउन ती वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटगॉन वर आदळली आणि पुढची काही वर्षे अल कायदा, ओसामा, वॉर अगेन्स्ट टेररिझम इत्यादी शब्दांनी लोकांच्या डोक्यात थैमान घातले. आता युद्ध करायचे म्हणजे शत्रू तर हवाच मग ओसामा आणि तालिबान नावाचे शत्रू (एकेकाळचे मित्र) महिन्याभरात शोधले गेले. "आमच्याबरोबर आलात तर मित्र, नाहीतर आमचे शत्रू" असे वडिलांच्याच स्टाइलीत सरळ सांगून मित्रसुद्धा मिळवले. आता युद्ध करायची जागा पण हवी आणि जिथे शोधूनही काही सापडणार नाही अशा जागी ओसामाला शोधून काढण्यासाठी अफगाणिस्तान वर हल्ला चढवला गेला. आता हे कमी की काय म्हणून यांनी आता सद्दाम हुसैन नावाच्या (एकेकाळचा अत्यंत जवळचा मित्र) माणसाने त्याच्या घरात भयंकर शस्त्रास्त्रे दडवून ठेवल्याचा शोध झटपट लावला आणि ही सगळी टोळी आता २००३ मध्ये इराकमध्ये घुसली. सद्दाम फासावर लटकलेला टीव्हीवर दाखवला गेला आणि शस्त्रांचा पत्ता काही लागला नाही. तेव्हा सुरु झालेला हा या मित्रांचा खेळ आजही चालूच आहे. ह्या खेळात लक्षावधी निरपराध जीव आणि ११४७ अब्ज डॉलर्स (म्हणजे ए. राजाने केलेल्या घोटाळ्याच्या फक्त ३५ पट) खर्च केले आहेत. आणि हे पैसे कुठून आलेत याचा हिशेब द्यायला नकोच.

तर पैसा. पैसा ह्या दशकात खूप मोठा झाला. जगभरातली शेअर मार्केट्स वेड्यासारखी पळत सुटली, जागांच्या किमतीपासून भ्रष्टाचाराच्या आकड्यांनी पूर्वीचे सगळे विक्रम मोडले. बीसीसीआय नावाच्या एका कंपनीने तर चार तासाच्या आयपीएल नावाच्या शोसाठी खेळाडूच विकायला काढले आणि बोली लावून गुलाम विकत घेण्याची बैलबाजारू प्रथा परत सुरु होते की काय अशी शंका येवू लागली. अमाप पैसा मिळाल्यामुळे हे नवगुलाम इतके खूष झाले की भावनातिरेकाने एकमेकांच्या थोबाडीत मारू लागले आणि लोकही मनोरंजनाच्या नावाखाली हे सगळे मजेत रोज संध्याकाळी पाहू लागले. लोकांकडे पैसा येवू लागला होता. आणि तो हॉटेल्स, मॉल्स इतकेच काय तर सास बहुच्या टीव्ही सिरिअल्समधून रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीन वेळा दिसू लागला होता. इंडिया कधी नव्हे तो शाईन होवू लागला होता आणि त्याचवेळी तिथल्याच भारतातला शेतकरी कर्जात बुडत चालला होता.

तर कर्ज. मोबाईल आणि ऑटोमोबाईल यांचे आता अप्रूप राहिले नव्हते. घरापासून गाडी पर्यंत सगळ्या गोष्टींसाठी कर्ज सुलभ हफ्त्यात मिळू लागले. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, न फेडता येणारे कर्ज फेडण्यासाठी परत आणखी कर्ज मिळू लागले. आणि ह्या कर्जाच्या विळख्यात पैसा इतका जोरात फिरू लागला की किमती भरमसाठ वाढल्यामुळे हे कर्जच एक दिवस सगळ्यांना घेवून बुडणार आहे ह्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नाही. जमीन आणि मालमत्तांचे भाव इतके वाढले की त्या कुणालाही परवडेनाश्या झाल्या. आता त्यांचे पुढे काय होणार असा प्रश्न पडायला सुरुवात झालीच होती की फारशी चौकशी न करता कर्ज वाटले गेलेल्या काही कर्जदारांनी मालमत्तेला हवा तेवढा भाव न मिळाल्यामुळे कर्ज बुडीत काढली आणि अमेरिका आणि पर्यायाने जग मंदीच्या विळख्यात सापडले. ह्यात लहान मोठ्या बँकांपासून ते "लेहमन ब्रदर्स" आणि "जनरल मोटर्स" सारखे डाय्नोसोर्स पाहता पाहता नामशेष झाले. कालांतराने ह्याची कारणे प्रत्येकाला जमेल तशी शोधली गेली आणि मग ह्या समस्येला "सबप्राईम क्रायसिस" असे गोंडस नाव देवून विद्यापीठे, टीव्हीवरचे आणि नाक्यावरचे काही विद्वान ह्या समस्येची उकल करायला बसले. मग तेव्हा पोठीनिष्ठांना मार्क्सबाबा आठवला तर कोणी केनेशिअन अर्थशास्त्राची पुस्तके शोधू लागली. अमेरिकेने package च्या नावाखाली डॉलर छाप छाप छापला आणि ज्यांची हाव ह्या संकटाला कारण ठरली होती त्या बँकांनाच शेवटी वाटला आणि बाजारात फुगलेल्या डॉलरचा अण्णू गोगट्या झाला (म्हणजे तो पडला हो). सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडे असणाऱ्या ह्या असामान्य घटनांनी मानवी स्वभावाच्या समूहाच्या मागे बेबंदपणे धावण्याच्या सामान्य प्रवृत्तीला परत एकदा अधोरेखित केले.

धर्म, भाषा,प्रांत आणि मिळेल ते काहीही यांच्या नावाखाली समूह एकमेकांचे गळे धरतच राहिले. काश्मीर, जाफना आणि जेरुसलेम तेवढेच धगधगत राहिले. दहशतवादाने ह्या दशकात कधी नव्हे तेवढे थैमान घातले. २००३ मधल्या मद्रिदमधल्या ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटांसारखे स्फोट पुढे हुबेहूब लंडन आणि मुंबईत झाले. कराची-इस्लामाबाद मधल्या स्फोटांनी पेपरातला एक कोपरा रोज व्यापून टाकला. फक्त मृतांचा आकडा बदलत राहिला. आणि एक दिवस समुद्रमार्गे आलेल्या कसाब आणि टीमने मुंबईकरांच्या मनावर कधीही न भरू शकणारी जखम केली.तसा दुसऱ्या दिवशी मुंबईकर बिचारा परत कामाला लागला आणि आणि आपल्या ह्या वृत्तीचे कौतुक बरेच दिवस इतरांना सांगत राहिला.

तर कौतुक. ग्लोबलायझेशन आणि त्याद्वारे होणाऱ्या सर्वसमावेशक विकासाचे आम्हाला काय कौतुक? शेअरबाजारू पिवळ्या पेपरातील त्यांचे पोवाडे वाचताच मध्यमवर्गीय आपली मते बनवत होता. ग्लोबलायझेशन आणि विकास यांच्या नावाखाली माणूस जंगले जाळत, माती खणत, हवा आणि पाणी बेमुर्वतपणे प्रदूषित करत सुटला. क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारताना आपल्या आजूबाजूला होणाऱ्या पर्यावरणाच्या ह्रासाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत गेला. ह्या विनाशाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याचे काही कारणच नव्हते. त्यांनी तर जनतेसमोर नवनवीन "आदर्श" निर्माण करून ठेवण्याचा चंगच बांधला होता. चारा, पैसे, भूखंड अशा पदार्थांचा खाद्यसंस्कृतीत नव्यानेच समावेश झाला होता असे नाही पण एकूणच ह्यांची भूक बरीच वाढली होती. मागच्या दशकातल्या मोठ्यात मोठ्या घोटाळ्याला लाजवतील असे घोटाळे साधे मंत्री-संत्री करू लागले. एका मंत्र्याने (भरपूर मोठी रक्कम मोजण्याचा हा माझ्यासाठी मापदंडच झाला आहे) केलेला घोटाळा तर म्हणे जगातल्या १०० (१८१ पैकी) देशांच्या GDP पेक्षा मोठा होता!!

युद्धखोरी आणि संपत्तीच्या हव्यासापायी बेधुंद झालेल्या ह्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मात्र मानवी जीवनात बरेच बदल घडवून आणले Microsoft, Google आणि apple यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. ईमेलची नवलाई राहिली नव्हती की काय म्हणून ऑर्कुट, फेसबुक आणि ट्वीटरने लोकांना एकमेकांच्या भलतेच जवळ आणले आणि ७० वर्षांच्या आजोबांना तिसरीत त्यांच्या बाकावर बसणारी त्यांची मैत्रीण पुन्हा भेटली. हजारो GB चा डेटा लोक खिशात घालून फिरू लागले आणि मोठे मोठे चित्रपट एका रात्रीत आपल्या PC वर download करू लागले. त्यांच्या भोवतालच्या हवेत किती आणि काय काय प्रकारची माहिती किती स्वच्छंदपणे विहार करत होती आणि तेही त्यांना फारसा पत्ता लागू न देता. रोबो आता बरीच कामे करू लागला होता. तसा तो मंगळावरही जावून धडकला आणि त्याच्या कॅमेऱ्याने तिथून बरेच फोटोही पाठविले. बाकी पृथ्वीवरच्या कॅमेऱ्यांचे आकार एवढे लहान झाले की कोणीही कोणाचेही स्टिंग ऑपरेशन करू लागला. मानवाच्या जनुकाचा ९९.९९% अचूक आराखडा ९९% जनुकांसाठी तयार झाला आणि बऱ्याच रोगांचा समूळ नायनाट करण्याची आशा निर्माण झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या दशकाने मानवाला अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचे प्रेरणा दिली. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या उर्जेचा वापर तो दैनंदिन जीवनात करू लागला. उद्या त्यावर गाड्याच काय तर कारखानेही चालतील आणि विमानेही उडतील.

पण जगण्याची पद्धत आणि विचार करण्याची परिमाणे बदलून टाकणाऱ्या ह्या दशकात काही गोष्टी अजूनही नाही बदलल्या. माधुरी दिक्षित आजही तेवढीच सुंदर आहे आणि देव आनंद (आणि आता मिथून) सारखे काही लोक आजही तेवढेच तरुण आहेत. सचिनची bat जर आजही तळपतेय, लतादिदीची गाणी जर आजही तेवढीच सुंदर वाटतात, पुल नसले म्हणून काय झाले? त्यांची पुस्तके आजही तेवढीच हसवातायेत, आणि मराठीत आजही उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती (मी करतोय तशी नाही) होतेय तर एखाद्या अस्वस्थ दशकाची अखेर फारशी वाईट झाली नाही असेच म्हणायचे...

स्वप्निल भाऊ वाळुंज

1 comment:

  1. Pudhachyaa post purtee pan kahi shillak thevaa mhatla !! :P

    ReplyDelete