Tuesday, February 1, 2011

मराठी वाचता येणाऱ्या (आणि वाचलेलं कळणाऱ्या) सर्वांना नमस्कार,

सर्वप्रथम माझ्याबद्दल (थोडक्यात)

नाव :- कु. स्वप्निल भाऊ वाळुंज (अजून फारसा प्रसिद्ध झालो नाहीये, नाहीतर ओळख करून देण्याची वेळ आली नसती)
वय:- २८ वर्षे सध्या आणि पुढे वाढत राहण्याची दाट शक्यता.
शिक्षण:- जेमतेम, तरी बरीच वर्षे शिकत होतो. डिग्र्या गोळा करण्याची आवड. तसे खरे शिक्षण शाळेबाहेरच झाले.
उपजीविकेचे साधन:- महिन्याच्या शेवटी हाती पडणारा तुटपुंजा पगार. सध्या नोकरीत दिवस कंठतोय.
निवासस्थान :- जन्माने आणि मनाने(?) तसा पक्का मुंबईकर, सध्या नवी मुंबईत तळ ठोकून आहे.
इतर माहिती:- फारशी महत्वाची नाही. आणि सांगण्यासारखेहि फार काही नाही.
इथे खरडपट्टी करण्याचे कारण:- समाजप्रबोधन म्हणा (म्हणायला काय जातंय?)

तर,
"दिसामाजी लिहावे काहीतरी" असे रामदासांनी कुठेतरी (अर्थात दासबोधात) लिहून ठेवलंय. आता एकदा रामदासस्वामींनी सांगितले म्हणजे त्याचा हेतू "एताद्देशियांचे शुद्धलेखन सुधारावे" ह्यापेक्षा नक्कीच उदात्त असला पाहिजे. तर असाच एखादा उदात्त हेतू मनात (आणि मनातच) ठेवून हा केलेला हा लेखनप्रपंच. अर्थात यामुळे संभाव्य वाचकांना होऊ घातलेल्या अक्षम्य मनस्तापाची लेखकास पूर्ण कल्पना आहे आणि त्यांच्याबद्दल अतीव सहानुभूती आहे.

माणूस का लिहितो? खरंतर काहीबाही वाचल्यानंतर वाचकांना पडणाऱ्या ह्या प्रश्नाबद्दल मी बोलत नाहीये. एकंदरीत हि लिहिण्याची उर्मी येते कुठून? वर्षोनुवर्ष हि उर्मी यशस्वीपणे दाबून ठेवलेल्या माझ्यासमोर हा प्रश्न शेवटी उभा ठाकलाच. संवाद साधण्याची गरज हे या मागचे महत्वाचे कारण असे मनोविज्ञान सांगते. आता हा संवाद लेखकाने बऱ्याच वेळेला वाचकांशी तर काही वेळेला स्वतःशीच साधला असतो. आणि प्रत्येक संवादामागे काही तरी कारण असतेच. बऱ्याच यशस्वी लेखकांच्या लिखाणातून त्यांनी वाचकांशी केलेली मनोज्ञ हितगुज वाचकांना भावते आणि तिथेच कुठेतरी लेखक आणि वाचक यांच्या मनाचा धागा जुळून एक संवाद साधला जातो. हा संवाद कधी पुस्तकरूपाने प्रकाशित होतो, तर कधी ब्लॉगच्या माध्यमातून. कधी संपादकाकडून साभार परत जातो तर कधी वाचकांकडून रद्दीत. उत्तरपत्रिकेद्वारे परीक्षकाशी साधला गेलेला संवाद, आणि कुठल्यातरी कार्ट्याने नसत्या वयात प्रेमपत्र लिहिण्याचा केलेला उपद्व्याप हि लिखाणाची आणखी काही उदाहरणे. थोडक्यात काय तर ह्या सगळ्या खटाटोपामुळे लेखन आणि पर्यायाने वाचन संस्कृती आकार घेते.

वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत चालल्याची (साहित्य संमेलनाच्या मागे पुढे होणारी) कुजबुज कानी पडल्यामुळे प्रस्तुत लेखक प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने काहीतरी करण्याचा संकल्प नवीन वर्षात सोडला. कळायला लागल्याच्या वयापासून ( नेमक्या वयाबद्दल संशोधकांत मतभेद आहेत, वाचकांचे त्याच्याशी घेणेदेणे नसावे) लेखकाने बरेच काही पहिले, ऐकले, वाचले आहे आणि त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर त्याची काही ठाम मते आहेत असा त्याचा दावा आहे (पण ऐकून कोण घेतो?). आता एवढी मते झाल्यानंतर त्यांची कुठेतरी नोंद व्हावी अशी माफक अपेक्षा त्याने बाळगली आणि त्यातूनच ह्या ब्लॉगचा जन्म होण्याची हि (सुरस आणि चित्तथरारक) कहाणी. तर येत्या काळात ह्या ब्लॉग वरून वाचकांच्या पुढ्यात कधी फुले तर कधी चिमटे, कधी गुदगुल्या तर कधी बुक्के - लाथाळ्या, कधी आशेचा तर कधी नेहेमीचा रडका सूर येणार आहे. पण ह्या अक्षरांतून उमटणारी साद थेट मनातून आली असेल आणि मनाचा ठाव घेण्यासाठी असेल. शुद्धालेखनासारख्या साध्या चुका आणि वयाबरोबर येणाऱ्या परीपक्वतेच्या अभावामुळे होऊ घातलेल्या मोठ्या प्रमादांकडे कानाडोळा करण्याइतके वाचक नक्कीच मोठ्या मनाचे आहेत ह्याची मला खात्री आहे. बाकी सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

आपला नम्र,
स्वप्निल भाऊ वाळुंज
ऐसी अक्षरे.........

2 comments:

  1. ek number blog aahe bhau!!! follow kartoy, regular update kar aata!

    ReplyDelete
  2. ek number swapnil...lihat raha..

    ReplyDelete