Saturday, April 30, 2011

भ्रष्टाचार.. आपलंच कुठतरी चुकतंय.....



साधरण महिन्याभरापूर्विचीच गोष्ट आहे, सबंध भारत जल्लोषात होता. धोनीच्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्याची धुंदी अजूनही उतरली नव्हती. फक्त काही दिवसांपूर्वीच ज्या ठिकाणी टीव्ही, पेपर आणि नाक्या-नाक्यावर आदर्श, 2G आणि कॉमनवेल्थच्या नावाने होणाऱ्या चिखलफेकीच्या जागी आता सचिन आणि धोनीवर स्तुतिसुमने उधळली जात होती. ह्या नशेत लोक राजकारण्यांची सगळी पापे विसरली होते. एकूणच सगळीकडे आनंदी आनंद होता. आणि ही धुंदी कमी कि काय म्हणून फक्त पाचच दिवसात सुरु होणाऱ्या आयपीएलचे आडाखे बांधायला सुरुवात सुद्धा झाली होती. पुढच्या महिन्या दीड महिन्यासाठी वेळ घालवण्यासाठी माझ्यासारख्या रिकामटेकड्यांना आणि पोटपाणी चालवण्यासाठी प्रसारमाध्यमांना कसलीही चिंता नव्हती, सरकार आणि मोकाट सुटलेले भ्रष्ट राजकारणी यांनी सुटकेचा श्वास सोडलाच होता आणि एवढ्यात अण्णा हजारे दिल्लीत जंतरमंतर येथे "जन लोकपाल" विधेयकासाठी आमरण उपोषणाला बसणार असल्याची एक बातमी "ब्रेकिंग न्यूज" म्हणून लोकांसमोर झळकली.

किसन बाबुराव हजारे नावाचे वादळ महाराष्ट्राला तसे नवे नाही. सरकारी कचेरीतल्या बाबूपासून मंत्रालयातल्या खाबूपर्यंतच्या लोकांची झोप उडवण्याचे आणि त्यातल्या कित्येकांना घराचा रस्ता दाखवण्याचे काम राळेगण सिद्धीचा हा गांधीवादी माणूस इमानेइतबारे वर्षानुवर्षे करत होता. त्यांच्या या प्रयत्नांना कधी यश आले तर कधी त्यांच्यामुळे त्यांना येरवड्याच्या तुरुंगातही जावे लागले होते. दारूबंदी, शिक्षणप्रसार, जल व्यवस्थापन, माहितीचा अधिकार आणि अस्पृश्यता निर्मुलनापासून ते भ्रष्टाचार निर्मूलनापर्यंतच्या लढाया ते गेली ३५ वर्षे सतत लढत होते. आणि नेमक्या अशाच एका चेहऱ्याची गरज "इंडिया अगेन्स्ट करप्शन" नावाच्या चळवळीला होती आणि याच झेंड्या खाली अण्णा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातल्या शेकडो शहरातील लाखो लोक ५ एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसले आणि भारताला मध्यम वर्ग अचानक खडबडून जागा झाला. वृत्तवाहिन्या, एफेम, फेसबुक, ट्विटरवर सर्वत्र अण्णांच्या नावाची चर्चा सुरु झाली, अण्णांच्या कार्याचे त्याच्या भाषणांचे व्हिडीओ शेअर करून किंवा तत्सम मेसेजेसना "लाईक" करून प्रत्येकजण आपला पाठींबा व्यक्त करत करत भ्रष्टाचारविरोधी लढाईत आपला "खारीचा" वाटा उचलू लागला. गेल्या अठरा वर्षांपासून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारेंची दिल्लीतील याच वृत्तवाहिन्या साधी दखलही घेत नव्हत्या पण जंतरमंतरवरील पाच दिवसांच्या झंझावाताने अण्णांचा ब्रँड विश्वचषकजिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापेक्षा मोठा झाला आणि याच तव्यावर आपली पोळी भाजून घेणार्यांचे स्वार्थी कोंडाळेही त्यांच्याभोवती अनेकपटींनी वाढले. नेहेमीप्रमाणे आततायी प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी सरकार विरोधात शास्त्र उपसले. शेवटी मानहानी सहन न झाल्याने दाती तृण धरून आलेल्या सरकारने शरणागती पत्करली आणि "जन लोकपाल विधेयकाच्या" मुद्द्यावरची आपली भूमिका सोडली. "जन लोकपाल विधेयक" तर सोडाच पण "लोकपाल" म्हणजे कोण, तो काय काम करतो याची पुसटशीही कल्पना नसलेल्या बऱ्याच लोकांनी ही "सरकार विरोधी" लढाई जिंकल्याच्या आवेशात तुफान जल्लोष सुरु केला. लोकशाहीत "सरकार" या शब्दाला "लोकांचे राज्य" यापेक्षा वेगळा अर्थ नाही. म्हणजे "भारतीय सरकार विरोधी लढाई" या संज्ञेचा अर्थ "भारतीय संघराज्य किंवा भारतीय लोकांच्या विरोधात पुकारलेली लढाई" याच्यापेक्षा वेगळा लागायला नको. सध्या आपण अफजल गुरु आणि अजमल कसब ह्यांना ह्याच गुन्ह्याखाली दिलेल्या फाशीच्या शिक्षेची वाट पहाट पोसतोय. मग अण्णांवर किंवा ह्या देशातल्या लोकांवर हा गुन्हा करण्याची वेळ का यावी?

हि वेळ येण्याचे एकमेव कारण म्हणजे "सरकार" ह्या यंत्रणेने लोकांशी घेतलेली आणि लोकांनी त्या यंत्रणेने घेतलेली फारकत हे आहे. आणि त्यातून उद्भवलेल्या या विचित्र परिस्थितीला लोक म्हणजे आपण सगळे सर्वस्वी जबाबदार आहोत. लोकशाही ह्या संकल्पनेचा स्वीकार तर आपण केला पण तिचा अंगीकार आपण करू शकलो नाही. घटनादत्त अधिकारांबद्दल जागरूक असलेले आपण त्यायोगे आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत सोयीस्करपणे विसरत किंवा दुर्लक्षित चाललो आहोत. "समाज" ह्या कल्याणकारी संकल्पनेपासून आजचा समाज आणि त्याचे नेतृत्व फार दूर गेले आहे. सातत्याने आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक गुन्ह्याची ह्या समाजमनाला एवढी सवय झाली आहे कि त्याची संवेदना बोथट झाली आहे. किंबहुना त्याने ह्या गुन्ह्यांना आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून मान्यता दिली आहे. ह्या गुन्ह्यांनी तो निश्चितच व्यथित होतो आणि ही व्यथा विसरण्यासाठी टीव्हीवर सहज उपलब्ध असणाऱ्या एखाद्या मनोरंजनप्रधान नशेच्या आहारी जातो किंवा मॉल-मल्टीप्लेक्सकडे चाललेल्या झुंडीमध्ये सामील होवून कुठे तरी ह्या वातावरणापासून दूर मन रमवण्याचा प्रयत्न करतो. किंवा मोह्मायेपासून मुक्ती मिळवून देण्याची Guarantee देणाऱ्या अध्यात्म्याच्या नावाखाली ५०-५० हजार कोटी रुपयाची माया जमवणाऱ्या बाबा-बुवांच्या नादाला लागतो.

तसे पाहायला गेलो तर ह्या गुन्ह्यांची व्याप्ती खूपच गंभीर आहे. फक्त गेल्या वर्षभरात उघडकीस आलेल्या ३-४ घोटाळ्यांचा विचार करायला गेलो तर त्यांचे आकडे हे गांभीर्य सहजपणे उघडकीस आणतात. S-Band घोटाळा (२ लाख कोटी), 2G घोटाळा (१.७६ लाख कोटी), कॉमनवेल्थ घोटाळा (५५ हजार कोटी), हसन अली (५० हजार कोटी) ह्या फक्त चार घोटाळ्यांची बेरीज करता आपल्याला एक गोष्ट जाणवते कि मूठभर लोकांनी अब्जावधी भारतीयांच्या जवळपास ५ लाख कोटी (५ हजार अब्ज) रुपयाची फक्त काही वर्षात लूट केली आहे. ५,००० अब्ज ही थोडी थोडकी रक्कम नाही. ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या आणि त्यामुळे आत्महत्येचा मार्गाला लागलेल्या भारतीय शेतकऱ्याचे आयुष्य बदलवून टाकण्यासाठी ज्या नदी जोडणी प्रकल्पाची संकल्पना पुढे आली तिचा योगायोगाने आजच्या तारखेचा अपेक्षित खर्च जवळपास ५,००० अब्ज रुपये आहे. या प्रक्ल्पाद्वारे सध्याच्या सिंचनक्षेत्रापेक्षा जवळपास ३.५ लाख वर्ग किलोमीटर जास्तीचे क्षेत्र (भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे ११%) पाण्याखाली येऊ शकते आणि ३४,००० MW वीज (सध्याच्या क्षमतेच्या सुमारे १६%) उत्पन्न होऊ शकते. ह्याद्वारे उपलब्ध होणारा रोजगार तर सोडाच पण स्वस्त दारात उपलब्ध होणारे अन्न ह्या देशातल्या कितीतरी लोकांची भूक आणि स्वस्तात आणि मुबलक उपलब्ध झालेली वीज लाखो उद्योगांची गरज भागवू शकेल. म्हणजे जो पैसा अब्जावधी लोकांच्या कल्याणासाठी वापरला जायला पाहिजे होता तो आज मुठभर लोकांच्या खिशात किंवा त्यांच्या स्विस बँकाच्या अकाउंट मध्ये जाउन बसला आहे. आणि इथे आपण फक्त ४ घोटाळ्यांचा विचार केला आहे. बाकी घोटाळे करून जो पैसा आज सरकारी अधिकारी, राजकारणी आणि उद्योगपतींच्या ज्या स्विस अकाउंट मध्ये पडला आहे त्याचा आकडा ७०,००० अब्ज रुपये आहे. हा सगळा पैसा लोकांनी भरलेला कर आणि त्याच्या मालकीची असलेली राष्ट्रीय संपत्ती ह्यांना लुबाडून जमवलेला आहे. एवढ्या पैशांमध्ये भारतच काय पण सगळ्या जगातल्या लोकांच्या कल्याणकारी योजना राबवता येतील. आता हे वाचल्यानंतर कुठल्याही संवेदनशील नागरिकाच्या मनात प्रचंड चीड उत्पन्न होईल. आणि अण्णांसारखा तोही ह्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उठेल. पण हे बंड तो कसे आणि कधी करणार?

आज साधे सरकारी काम स्वतःहून करून घ्यायचा आत्मविश्वास आपण सगळे मध्यमवर्गीय गमावून बसलो आहोत. ते काम करून घेण्यासाठी मग मध्यस्थ शोधावा लागतो आणि सार्वजनिक जीवनात येथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. नितीमुल्याना येथूनच तडा जायला सुरुवात होते आणि भ्रष्टाचाराला विरोध करण्याचे नैतिक बळ लुप्त व्हायला तेथूनच सुरुवात होते. आज कर भरण्यासारख्या संकल्पनेकडे (जी संपत्तीचे सगळ्या समाजघटकात समसमान वाटप व्हावे ह्या उदात्त हेतूने राबवली जाते) तिच्याकडे एक खर्च म्हणून आपण बघतो. आणि सरकारच्या आणि भ्रष्ट राजकारण्याच्या नावाने बोटे मोडत भरलेल्या करावरचा आपला अधिकार आणि त्याचा योग्य वापर होतो आहे कि नाही याची जबाबदारी आपण तिथल्या तिथे झटकून मोकळी होतो. आणि मग पुढे आलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या नेत्याची वाट बघतो. अण्णांनी सुरु केलेल्या लढ्यात आपल्यातले बरेच जण फक्त एक सामुहिक उन्माद म्हणून सामील झालो आहोत हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. आणि समजा अण्णांच्या लढ्याला यश येवून समजा जण लोकपाल विधेयक (जसे त्यांना हवे तसे) पास झाले तरी याची परिणीती "लोकपाल" नावाच्या एका अनिर्बंध अधिकार असलेल्या यंत्रणेत होणार आहे हेही आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. ही यंत्रणा तयार करून सामान्य माणूस जर पुन्हा निद्राधीन झाला तर ह्या नवीन यंत्रणा भ्रष्ट व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि या पोलिसावर लक्ष ठेवण्यासाठी मग आणखी एका पोलिसाची नेमणूक करावी लागेल. तसे पाहता आजच्या लोकशाहीत जी यंत्रणा उपलब्ध आहे ती जर व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे राबवली गेली तर लोकपाल किंवा जन-लोकपाल सारख्या यंत्रणेची खरेच गरज नाही. नोकरशाही,न्यायव्यवस्था, राज्यसंस्था आणि प्रसारमाध्यमे यांनी आपापली कामे जर व्यवस्थित केली तर साध्या आहे ती यंत्रणा लोककल्याणासाठी पुरेशी आहे. पण ही आजच्या घडीला ही चारही माध्यमे काही मोजक्या भांडवलदारांच्या दावणीला बांधली गेलेली असून हे अभद्र युती नागरिकांचे प्रचंड शोषण करते आहे. समाजोपयोगी कामासाठी तयार होणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि प्रसिद्धीमाध्यमेही आज याच गटाच्या नादी लागून खंडणीखोर बनून स्वतःची तुंबडी भरल्यावर गप्प बसत आहेत.

परिस्थिती खरीच गंभीर आहे आणि दरसाल ९-१०% आर्थिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ह्या समाजाचे नैतिक आणि बौद्धिक अधःपतन अत्यंत वेगाने होत आहे. ह्या देशातला तरुण एका अशा नेतृत्वाची वाट पहाट आहे ज्याला ह्या देशातल्या लोकांची, त्यांच्या गरजांची जाणीव असेल आणि जो निस्वार्थीपणे फक्त देशाच्या विकासासाठी झटेल. असे नेतृत्व समोर दिसत नसल्याचे पहिल्यावर तोही त्याच्या आजूबाजूला असलेल्या आमिषांना बळी पडून स्वतःची संवेदना हरवून बसत आहे. पण हे जे नेतृत्व असेल ते आपल्यातूनच निर्माण होणारे असेल आणि त्याला निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाचीच असेल. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचे आणि पर्यायाने समाजाचे अहित करण्याची प्रवृत्ती नाहीशी करण्याची संधी आपल्याकडे नेहेमीच असते. आणि हा संदेश आपल्या पुढच्या पिढीला देण्याची जबादारी आपल्या सर्वाची आहे. आणि हे करताना आपण त्या पिढीला फक्त नितीमानच नाही तर जागरूक आणि हुशार सुद्धा बनवत आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आजच्या परिस्थितीत जर सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती ह्या लढ्यात सजगपणे भाग घेण्याची आहे. लोकशाही आणि घटनेच्या चौकटीत बसणारी जी शस्त्रे असतील ते सगळी उपसून आज आपण ह्या भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देण्यास सज्ज होण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. मग ते शस्त्र आमरण उपोषणाचे असेल किंवा विधायक चर्चा-लिखाणाच्या माध्यमातून केलेल्या प्रबोधनाचे असेल. भ्रष्ट उद्योगपती, राजकारणी, सरकारी अधिकारी हे सगळे आपल्या समाजाचा भाग आहेत. आपल्या समाजाचे खरे शत्रू आपल्या स्वभावात/ प्रवृत्तीमध्ये दडलेले आहेत. एक नीतिमान, सुशिक्षित आणि जागरूक समाजाला फसवणे कुठल्याही व्यक्ती किंवा यंत्रणेला सहज शक्य होवू शकणार नाही.

- स्वप्निल वाळुंज.

Thursday, February 3, 2011

एका अस्वस्थ दशकाची अखेर.....

नवे सहस्त्रक सुरु होऊन दहा वर्षे पूर्ण झालीत. कालगणनेच्या इतिहासात दहा वर्षे म्हणजे तसा फारसा मोठा कालखंड नाही. तरीही गेल्या दहा वर्षांनी जगाला जे इतके काही दिले त्याचा हिशेब मांडायचा झाला तर माझ्या सारख्या माणसाचे आणखी एक दशक काय पण पुढचे सगळ आयुष्य खर्ची पडेल. तरीपण हे शिवधनुष्य (अरे जिभेला काही हाड?) पेलण्याचा प्रयत्न करण्याचा मोह आवरला नाही म्हणून इथे लिहितोय.

दहा वर्षांपूर्वी जग थोडेसे वेगळे होते. आम्ही नुकताच इंजिनियरिंगला प्रवेश घेतला होता आणि जगण्यातल सौंदर्य अचानक कमी झाले आहे हे आजूबाजूला बघून जाणवत होते. बऱ्याच मुलांना एकतर आयटी इंजिनियर व्हायचे होते किंवा अमेरिकेत जायचे होते. माझ्यासारख्या बऱ्याचजणांना खरेतर ह्या दोघांतले काहीही करायचे नव्हते कारण आपल्याला नक्की काय करायचे आहे हेच त्यांना माहिती नव्हते. "तू मोठा झाल्यावर कोण होणार?" ह्याचे "पायलट" असे विजयी मुद्रेने दिलेल्या उत्तराचे रूपांतर आता "बघूया" (म्हणजे खरे तर "माहित नाही") असे म्हणून क्षणभरासाठी उसने आणलेल्या केविलवाण्याहास्यात झाले होते.

जगाचा नकाशा एव्हाना बराच बदलला होता. सोविएत रशिया नावाचा देश जगाच्या नकाशावर आता शोधूनही सापडत नव्हता. नेहरूंच्या समाजवादी भारताला डॉ. मनमोहन सिंगांच्या मुक्त अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्णत्वास आलेले पाहायला मिळत होते. जगाच्या मानगुटीवर बसलेले वायटूके चे भूत भारतीयांनी उतरवले होते आणि त्यातच अमेरिकेत डॉट कॉमचा फुगा नुकताच फुटला होता, एनरॉन अजूनही "America's Most Innovative Company" होती (ज्यांची innovations महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या तोंडाला फेस आणणारी ठरली हा भाग वेगळा. असो, Microsoft नावाचा टारगट मुलगा कोर्टात अंगठे धरून उभा होता आणि गुगल नावाचे बाळ नुकतंच रांगू लागले होते. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक (कशीबशी) आटोपली होती आणि २० जानेवारी २००१ रोजी श्री. जॉर्ज वॉकर बुश नावाच्या महाशयांनी अध्यक्षपदाची (किंवा वडिलांनी अर्धवट सोडलेले काम काहीही करून पूर्ण करण्याची) शपथ घेतली आणि तिथेच माशी शिंकली.

त्यानंतर फक्त आठ महिन्यानानंतर कुठल्याश्या अतिरेक्यांनी अमेरिकेत चार विमाने ताब्यात घेउन ती वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटगॉन वर आदळली आणि पुढची काही वर्षे अल कायदा, ओसामा, वॉर अगेन्स्ट टेररिझम इत्यादी शब्दांनी लोकांच्या डोक्यात थैमान घातले. आता युद्ध करायचे म्हणजे शत्रू तर हवाच मग ओसामा आणि तालिबान नावाचे शत्रू (एकेकाळचे मित्र) महिन्याभरात शोधले गेले. "आमच्याबरोबर आलात तर मित्र, नाहीतर आमचे शत्रू" असे वडिलांच्याच स्टाइलीत सरळ सांगून मित्रसुद्धा मिळवले. आता युद्ध करायची जागा पण हवी आणि जिथे शोधूनही काही सापडणार नाही अशा जागी ओसामाला शोधून काढण्यासाठी अफगाणिस्तान वर हल्ला चढवला गेला. आता हे कमी की काय म्हणून यांनी आता सद्दाम हुसैन नावाच्या (एकेकाळचा अत्यंत जवळचा मित्र) माणसाने त्याच्या घरात भयंकर शस्त्रास्त्रे दडवून ठेवल्याचा शोध झटपट लावला आणि ही सगळी टोळी आता २००३ मध्ये इराकमध्ये घुसली. सद्दाम फासावर लटकलेला टीव्हीवर दाखवला गेला आणि शस्त्रांचा पत्ता काही लागला नाही. तेव्हा सुरु झालेला हा या मित्रांचा खेळ आजही चालूच आहे. ह्या खेळात लक्षावधी निरपराध जीव आणि ११४७ अब्ज डॉलर्स (म्हणजे ए. राजाने केलेल्या घोटाळ्याच्या फक्त ३५ पट) खर्च केले आहेत. आणि हे पैसे कुठून आलेत याचा हिशेब द्यायला नकोच.

तर पैसा. पैसा ह्या दशकात खूप मोठा झाला. जगभरातली शेअर मार्केट्स वेड्यासारखी पळत सुटली, जागांच्या किमतीपासून भ्रष्टाचाराच्या आकड्यांनी पूर्वीचे सगळे विक्रम मोडले. बीसीसीआय नावाच्या एका कंपनीने तर चार तासाच्या आयपीएल नावाच्या शोसाठी खेळाडूच विकायला काढले आणि बोली लावून गुलाम विकत घेण्याची बैलबाजारू प्रथा परत सुरु होते की काय अशी शंका येवू लागली. अमाप पैसा मिळाल्यामुळे हे नवगुलाम इतके खूष झाले की भावनातिरेकाने एकमेकांच्या थोबाडीत मारू लागले आणि लोकही मनोरंजनाच्या नावाखाली हे सगळे मजेत रोज संध्याकाळी पाहू लागले. लोकांकडे पैसा येवू लागला होता. आणि तो हॉटेल्स, मॉल्स इतकेच काय तर सास बहुच्या टीव्ही सिरिअल्समधून रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीन वेळा दिसू लागला होता. इंडिया कधी नव्हे तो शाईन होवू लागला होता आणि त्याचवेळी तिथल्याच भारतातला शेतकरी कर्जात बुडत चालला होता.

तर कर्ज. मोबाईल आणि ऑटोमोबाईल यांचे आता अप्रूप राहिले नव्हते. घरापासून गाडी पर्यंत सगळ्या गोष्टींसाठी कर्ज सुलभ हफ्त्यात मिळू लागले. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, न फेडता येणारे कर्ज फेडण्यासाठी परत आणखी कर्ज मिळू लागले. आणि ह्या कर्जाच्या विळख्यात पैसा इतका जोरात फिरू लागला की किमती भरमसाठ वाढल्यामुळे हे कर्जच एक दिवस सगळ्यांना घेवून बुडणार आहे ह्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नाही. जमीन आणि मालमत्तांचे भाव इतके वाढले की त्या कुणालाही परवडेनाश्या झाल्या. आता त्यांचे पुढे काय होणार असा प्रश्न पडायला सुरुवात झालीच होती की फारशी चौकशी न करता कर्ज वाटले गेलेल्या काही कर्जदारांनी मालमत्तेला हवा तेवढा भाव न मिळाल्यामुळे कर्ज बुडीत काढली आणि अमेरिका आणि पर्यायाने जग मंदीच्या विळख्यात सापडले. ह्यात लहान मोठ्या बँकांपासून ते "लेहमन ब्रदर्स" आणि "जनरल मोटर्स" सारखे डाय्नोसोर्स पाहता पाहता नामशेष झाले. कालांतराने ह्याची कारणे प्रत्येकाला जमेल तशी शोधली गेली आणि मग ह्या समस्येला "सबप्राईम क्रायसिस" असे गोंडस नाव देवून विद्यापीठे, टीव्हीवरचे आणि नाक्यावरचे काही विद्वान ह्या समस्येची उकल करायला बसले. मग तेव्हा पोठीनिष्ठांना मार्क्सबाबा आठवला तर कोणी केनेशिअन अर्थशास्त्राची पुस्तके शोधू लागली. अमेरिकेने package च्या नावाखाली डॉलर छाप छाप छापला आणि ज्यांची हाव ह्या संकटाला कारण ठरली होती त्या बँकांनाच शेवटी वाटला आणि बाजारात फुगलेल्या डॉलरचा अण्णू गोगट्या झाला (म्हणजे तो पडला हो). सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडे असणाऱ्या ह्या असामान्य घटनांनी मानवी स्वभावाच्या समूहाच्या मागे बेबंदपणे धावण्याच्या सामान्य प्रवृत्तीला परत एकदा अधोरेखित केले.

धर्म, भाषा,प्रांत आणि मिळेल ते काहीही यांच्या नावाखाली समूह एकमेकांचे गळे धरतच राहिले. काश्मीर, जाफना आणि जेरुसलेम तेवढेच धगधगत राहिले. दहशतवादाने ह्या दशकात कधी नव्हे तेवढे थैमान घातले. २००३ मधल्या मद्रिदमधल्या ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटांसारखे स्फोट पुढे हुबेहूब लंडन आणि मुंबईत झाले. कराची-इस्लामाबाद मधल्या स्फोटांनी पेपरातला एक कोपरा रोज व्यापून टाकला. फक्त मृतांचा आकडा बदलत राहिला. आणि एक दिवस समुद्रमार्गे आलेल्या कसाब आणि टीमने मुंबईकरांच्या मनावर कधीही न भरू शकणारी जखम केली.तसा दुसऱ्या दिवशी मुंबईकर बिचारा परत कामाला लागला आणि आणि आपल्या ह्या वृत्तीचे कौतुक बरेच दिवस इतरांना सांगत राहिला.

तर कौतुक. ग्लोबलायझेशन आणि त्याद्वारे होणाऱ्या सर्वसमावेशक विकासाचे आम्हाला काय कौतुक? शेअरबाजारू पिवळ्या पेपरातील त्यांचे पोवाडे वाचताच मध्यमवर्गीय आपली मते बनवत होता. ग्लोबलायझेशन आणि विकास यांच्या नावाखाली माणूस जंगले जाळत, माती खणत, हवा आणि पाणी बेमुर्वतपणे प्रदूषित करत सुटला. क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारताना आपल्या आजूबाजूला होणाऱ्या पर्यावरणाच्या ह्रासाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत गेला. ह्या विनाशाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याचे काही कारणच नव्हते. त्यांनी तर जनतेसमोर नवनवीन "आदर्श" निर्माण करून ठेवण्याचा चंगच बांधला होता. चारा, पैसे, भूखंड अशा पदार्थांचा खाद्यसंस्कृतीत नव्यानेच समावेश झाला होता असे नाही पण एकूणच ह्यांची भूक बरीच वाढली होती. मागच्या दशकातल्या मोठ्यात मोठ्या घोटाळ्याला लाजवतील असे घोटाळे साधे मंत्री-संत्री करू लागले. एका मंत्र्याने (भरपूर मोठी रक्कम मोजण्याचा हा माझ्यासाठी मापदंडच झाला आहे) केलेला घोटाळा तर म्हणे जगातल्या १०० (१८१ पैकी) देशांच्या GDP पेक्षा मोठा होता!!

युद्धखोरी आणि संपत्तीच्या हव्यासापायी बेधुंद झालेल्या ह्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मात्र मानवी जीवनात बरेच बदल घडवून आणले Microsoft, Google आणि apple यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. ईमेलची नवलाई राहिली नव्हती की काय म्हणून ऑर्कुट, फेसबुक आणि ट्वीटरने लोकांना एकमेकांच्या भलतेच जवळ आणले आणि ७० वर्षांच्या आजोबांना तिसरीत त्यांच्या बाकावर बसणारी त्यांची मैत्रीण पुन्हा भेटली. हजारो GB चा डेटा लोक खिशात घालून फिरू लागले आणि मोठे मोठे चित्रपट एका रात्रीत आपल्या PC वर download करू लागले. त्यांच्या भोवतालच्या हवेत किती आणि काय काय प्रकारची माहिती किती स्वच्छंदपणे विहार करत होती आणि तेही त्यांना फारसा पत्ता लागू न देता. रोबो आता बरीच कामे करू लागला होता. तसा तो मंगळावरही जावून धडकला आणि त्याच्या कॅमेऱ्याने तिथून बरेच फोटोही पाठविले. बाकी पृथ्वीवरच्या कॅमेऱ्यांचे आकार एवढे लहान झाले की कोणीही कोणाचेही स्टिंग ऑपरेशन करू लागला. मानवाच्या जनुकाचा ९९.९९% अचूक आराखडा ९९% जनुकांसाठी तयार झाला आणि बऱ्याच रोगांचा समूळ नायनाट करण्याची आशा निर्माण झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या दशकाने मानवाला अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचे प्रेरणा दिली. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या उर्जेचा वापर तो दैनंदिन जीवनात करू लागला. उद्या त्यावर गाड्याच काय तर कारखानेही चालतील आणि विमानेही उडतील.

पण जगण्याची पद्धत आणि विचार करण्याची परिमाणे बदलून टाकणाऱ्या ह्या दशकात काही गोष्टी अजूनही नाही बदलल्या. माधुरी दिक्षित आजही तेवढीच सुंदर आहे आणि देव आनंद (आणि आता मिथून) सारखे काही लोक आजही तेवढेच तरुण आहेत. सचिनची bat जर आजही तळपतेय, लतादिदीची गाणी जर आजही तेवढीच सुंदर वाटतात, पुल नसले म्हणून काय झाले? त्यांची पुस्तके आजही तेवढीच हसवातायेत, आणि मराठीत आजही उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती (मी करतोय तशी नाही) होतेय तर एखाद्या अस्वस्थ दशकाची अखेर फारशी वाईट झाली नाही असेच म्हणायचे...

स्वप्निल भाऊ वाळुंज

Tuesday, February 1, 2011

मराठी वाचता येणाऱ्या (आणि वाचलेलं कळणाऱ्या) सर्वांना नमस्कार,

सर्वप्रथम माझ्याबद्दल (थोडक्यात)

नाव :- कु. स्वप्निल भाऊ वाळुंज (अजून फारसा प्रसिद्ध झालो नाहीये, नाहीतर ओळख करून देण्याची वेळ आली नसती)
वय:- २८ वर्षे सध्या आणि पुढे वाढत राहण्याची दाट शक्यता.
शिक्षण:- जेमतेम, तरी बरीच वर्षे शिकत होतो. डिग्र्या गोळा करण्याची आवड. तसे खरे शिक्षण शाळेबाहेरच झाले.
उपजीविकेचे साधन:- महिन्याच्या शेवटी हाती पडणारा तुटपुंजा पगार. सध्या नोकरीत दिवस कंठतोय.
निवासस्थान :- जन्माने आणि मनाने(?) तसा पक्का मुंबईकर, सध्या नवी मुंबईत तळ ठोकून आहे.
इतर माहिती:- फारशी महत्वाची नाही. आणि सांगण्यासारखेहि फार काही नाही.
इथे खरडपट्टी करण्याचे कारण:- समाजप्रबोधन म्हणा (म्हणायला काय जातंय?)

तर,
"दिसामाजी लिहावे काहीतरी" असे रामदासांनी कुठेतरी (अर्थात दासबोधात) लिहून ठेवलंय. आता एकदा रामदासस्वामींनी सांगितले म्हणजे त्याचा हेतू "एताद्देशियांचे शुद्धलेखन सुधारावे" ह्यापेक्षा नक्कीच उदात्त असला पाहिजे. तर असाच एखादा उदात्त हेतू मनात (आणि मनातच) ठेवून हा केलेला हा लेखनप्रपंच. अर्थात यामुळे संभाव्य वाचकांना होऊ घातलेल्या अक्षम्य मनस्तापाची लेखकास पूर्ण कल्पना आहे आणि त्यांच्याबद्दल अतीव सहानुभूती आहे.

माणूस का लिहितो? खरंतर काहीबाही वाचल्यानंतर वाचकांना पडणाऱ्या ह्या प्रश्नाबद्दल मी बोलत नाहीये. एकंदरीत हि लिहिण्याची उर्मी येते कुठून? वर्षोनुवर्ष हि उर्मी यशस्वीपणे दाबून ठेवलेल्या माझ्यासमोर हा प्रश्न शेवटी उभा ठाकलाच. संवाद साधण्याची गरज हे या मागचे महत्वाचे कारण असे मनोविज्ञान सांगते. आता हा संवाद लेखकाने बऱ्याच वेळेला वाचकांशी तर काही वेळेला स्वतःशीच साधला असतो. आणि प्रत्येक संवादामागे काही तरी कारण असतेच. बऱ्याच यशस्वी लेखकांच्या लिखाणातून त्यांनी वाचकांशी केलेली मनोज्ञ हितगुज वाचकांना भावते आणि तिथेच कुठेतरी लेखक आणि वाचक यांच्या मनाचा धागा जुळून एक संवाद साधला जातो. हा संवाद कधी पुस्तकरूपाने प्रकाशित होतो, तर कधी ब्लॉगच्या माध्यमातून. कधी संपादकाकडून साभार परत जातो तर कधी वाचकांकडून रद्दीत. उत्तरपत्रिकेद्वारे परीक्षकाशी साधला गेलेला संवाद, आणि कुठल्यातरी कार्ट्याने नसत्या वयात प्रेमपत्र लिहिण्याचा केलेला उपद्व्याप हि लिखाणाची आणखी काही उदाहरणे. थोडक्यात काय तर ह्या सगळ्या खटाटोपामुळे लेखन आणि पर्यायाने वाचन संस्कृती आकार घेते.

वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत चालल्याची (साहित्य संमेलनाच्या मागे पुढे होणारी) कुजबुज कानी पडल्यामुळे प्रस्तुत लेखक प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने काहीतरी करण्याचा संकल्प नवीन वर्षात सोडला. कळायला लागल्याच्या वयापासून ( नेमक्या वयाबद्दल संशोधकांत मतभेद आहेत, वाचकांचे त्याच्याशी घेणेदेणे नसावे) लेखकाने बरेच काही पहिले, ऐकले, वाचले आहे आणि त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर त्याची काही ठाम मते आहेत असा त्याचा दावा आहे (पण ऐकून कोण घेतो?). आता एवढी मते झाल्यानंतर त्यांची कुठेतरी नोंद व्हावी अशी माफक अपेक्षा त्याने बाळगली आणि त्यातूनच ह्या ब्लॉगचा जन्म होण्याची हि (सुरस आणि चित्तथरारक) कहाणी. तर येत्या काळात ह्या ब्लॉग वरून वाचकांच्या पुढ्यात कधी फुले तर कधी चिमटे, कधी गुदगुल्या तर कधी बुक्के - लाथाळ्या, कधी आशेचा तर कधी नेहेमीचा रडका सूर येणार आहे. पण ह्या अक्षरांतून उमटणारी साद थेट मनातून आली असेल आणि मनाचा ठाव घेण्यासाठी असेल. शुद्धालेखनासारख्या साध्या चुका आणि वयाबरोबर येणाऱ्या परीपक्वतेच्या अभावामुळे होऊ घातलेल्या मोठ्या प्रमादांकडे कानाडोळा करण्याइतके वाचक नक्कीच मोठ्या मनाचे आहेत ह्याची मला खात्री आहे. बाकी सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

आपला नम्र,
स्वप्निल भाऊ वाळुंज
ऐसी अक्षरे.........